- Events /
- गोळवलकर गुरुजी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
गोळवलकर गुरुजी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत ८० वा स्वातंत्र्य दिन प्रशालेत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह मा.श्री. दीपक काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ. अपर्णा साने, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री. प्रसाद लागू आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ.वासंती बनकर तसेच इयत्ता चौथी, पाचवी सातवी, आठवी या इयत्तांमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावी मध्ये उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची ध्वजारोहणावेळी विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतक तसेच पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या सत्तेच्या जोखडातून मुक्त झाला. हे स्वातंत्र्य असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून मिळाले असल्याने त्यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कर्तव्यभावना आणि देशाप्रती जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय यांच्यासह असंख्य वीरांच्या योगदानाचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन एकसुरात राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्राच्या शौर्य, संतपरंपरा आणि अस्मितेचा गौरव करणारे महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी एकसुरात सादर केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा...’ हे ध्वजगीत सादर केले. राष्ट्रध्वज हा केवळ ध्वज नसून स्वाभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असल्याचा संदेश या गीतातून देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजासमोर निष्ठा आणि संविधाननिष्ठेची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री. दीपक काळे यांनी भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे , आपल्या आचरणात आणली पाहिजे आणि तिला सातत्याने वृद्धिंगत केली पाहिजे असं आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नसून त्यासोबत मोठी जबाबदारीही आहे, याची जाणीव करून देण्यात आली. देशाची एकता व अखंडता कायम राखणे, संविधानाचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे, सामाजिक सलोखा जपणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा जबाबदार नागरिक आणि देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे, त्यामुळे ज्ञान, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ सादर करण्यात आले. जात, पात आणि धर्म यांचे भेद विसरून राष्ट्रीय एकात्मतेने एकत्र येत भारताला जगातील श्रेष्ठ राष्ट्र बनविण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. स्वातंत्र्याचा वारसा जपत समृद्ध, सक्षम आणि अखंड भारत घडविण्याची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमामुळे प्रशालेत देशभक्ती, राष्ट्राभिमान आणि कर्तव्यभावनेचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रम
-
भोंडला कार्यक्रम
प्रशालेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्य ... Read More
-
शारदीय नवरात्रोत्सव ...
शाळेमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वाचे औच ... Read More
-
'सायबर सुरक्षा आणि ज ...
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा व ... Read More
-
भौतिकशास्त्र कार्यशा ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हाव ... Read More
-
जलशुद्धीकरण आणि सांड ...
अभ्यासक्रमातील घटकाशी संबंधित विषयाचे प्रत्यक्ष ... Read More